Belagavi

कॅन्टोन्मेंट च्या मासिक आढावा बैठकीत विविध विषयांवर चर्चा

Share

बेळगाव मधील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या आवारात नवीन व्यापारी संकुल उभारण्याच्या प्रस्तावाला खासदार जगदीश शेट्टर यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. कँटोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत त्यांनी ही भूमिका मांडली.

या ऐतिहासिक वारसास्थळाचे सौंदर्य आणि पावित्र्य जपण्यासाठी येथे व्यापारी संकुलाऐवजी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि मुलांसाठी भव्य क्रीडांगण उभारण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत किल्ल्याच्या समोरील जागेत फुल बाजार आणि ऑटोमोबाईल दुकाने सुरू करण्याच्या प्रस्तावावर जोरदार चर्चा झाली. या जागेवर गॅरेज किंवा पंक्चरची दुकाने सुरू झाल्यास परिसरात कचरा वाढेल आणि किल्ल्याचे सौंदर्य नष्ट होईल, अशी भीती खासदार शेट्टर यांनी व्यक्त केली.

यावर ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय यांनी स्पष्ट केले की, निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कंत्राटदारांनी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे आता हा निर्णय मागे घेतल्यास कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात. अखेर, मुख्य रस्त्याऐवजी पाठीमागील पडीक जागेचा वापर उत्पन्न वाढीसाठी करावा, असा पर्याय समोर आला असून यावर कायदेशीर सल्ला घेऊन अंतिम निर्णय घेण्याचे ठरले.

यासोबतच, कँटोन्मेंट हद्दीतील मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ४७ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच शाळांमध्ये बहुउद्देशीय सभागृह आणि स्वयंपाकघर बांधणे, हॉकी मैदानाचा विकास करणे आणि धोबीघाट परिसरातील बंद कूपनलिका तात्काळ सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने कंत्राटदार निविदा प्रक्रियेतून मागे हटत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम मंचलवार यांनी दिली. त्यावर सद्यस्थितीतील बाजारभावाप्रमाणे नवीन अंदाजपत्रक तयार करून फेरनिविदा काढण्याचे आदेश देण्यात आले.

या बैठकीला खासदार जगदीश शेट्टर, ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय, सीईओ सुदाम मंचलवार, सुधीर तुपेकर यांच्यासह कँटोन्मेंट बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते.

Tags: