बेळगावात जास्त परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर जिल्हा प्रशासनाने मध्यरात्री अचानक छापे टाकले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या आदेशानुसार, उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ‘गोवर्धन एलएलपी’ आणि ‘सिटी इंडेक्स’ या दोन कंपन्यांवर ही धडक कारवाई केली.

जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या सूचनेनंतर बेळगावचे उपविभागीय अधिकारी श्रवणकुमार नायक यांच्या नेतृत्वाखाली महसूल, सहकार आणि पोलीस विभागाच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली. टिळकवाडी येथील ‘गोवर्धन एलएलपी’ आणि महात्मा फुले रोडवरील ‘सिटी इंडेक्स’ या कंपन्यांच्या कार्यालयांवर कडक पोलीस बंदोबस्तात छापे टाकण्यात आले. अधिकाऱ्यांच्या या अनपेक्षित कारवाईमुळे फसवणूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, मध्यरात्रीपर्यंत दोन्ही कार्यालयांमधील महत्त्वाच्या कागदपत्रांची कसून तपासणी करण्यात आली.

प्राथमिक तपासणीत या दोन्ही कंपन्यांमध्ये नागरिकांनी ६५ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम गुंतवल्याचे उघड झाले आहे. यात ‘गोवर्धन एलएलपी’ कंपनीत ३५ कोटी रुपये, तर ‘सिटी इंडेक्स’ कंपनीत ३० कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी बेळगावात शिवम असोसिएट्स आणि आदित्य राज कॅपिटल या कंपन्यांवरही अशीच धडक कारवाई करण्यात आली होती. अल्पावधीत दुप्पट किंवा अधिक परतावा मिळण्याच्या आमिषाला बळी पडून अनेक नागरिकांनी अशा कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले असून, त्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे आता स्पष्ट होत आहे. सार्वजनिक पैशांचा असा अपहार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या या मोहिमेमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

“गोवर्धन कंपनीत ३५ कोटी आणि सिटी इंडेक्समध्ये ३० कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. गोवर्धन कंपनीचा सविस्तर अहवाल तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल. तसेच सिटी इंडेक्स कंपनीची ‘सेबी’ कडील नोंदणी अधिकृत आहे की नाही, याच्या सत्यतेची खात्री करण्यासाठी पुढील चौकशी आणि कारवाई सुरूच राहणार आहे.” अशी माहिती उपविभागीय अधिकारी श्रवणकुमार नायक यांनी दिली.


Recent Comments