बेळगाव मध्ये विजापूर पोलिसांनी एका न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करत साडेचार वर्षांच्या बालिकेला ताब्यात घेतले, ज्यावरून आता वाद निर्माण झाला आहे.

विजापूर येथील आदर्श नगर पोलीस ठाण्याचे पथक, संबंधित न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी बेळगावला आले होते. त्यांनी १६ जुलै रोजी मध्यरात्री १२:३० वाजता ही कारवाई केली. मात्र, न्यायालयाची मुदत १७ जुलै सायंकाळी ५ पर्यंत असताना, पोलिसांनी वेळेच्या आधीच आणि कोणतीही पूर्वसूचना न देता मुलीला ताब्यात घेतले, असा आरोप तिचे वडील आदित्य पोरचगाव यांनी केला आहे.

मुलीला नेण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचा चालक गणवेशात नव्हता आणि पोलिसांनी मज्जाव केल्याने कुटुंबियांना मुलीशी संवाद साधता आला नाही, असा दावा वडिलांनी सोशल मीडियावरील व्हिडिओद्वारे केला आहे.
एका अल्पवयीन मुलीला मध्यरात्री अशा प्रकारे नेण्याचे आदेश कोणी दिले आणि या प्रक्रियेत नियमांचे पालन झाले का, या प्रश्नांवर आदित्य यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून, मुलगी मातेच्या ताब्यात आहे.


Recent Comments