बेळगाव येथे हिडकल धरणासाठी जमिनी गमावूनही १० ते १२ वर्षांपासून मोबदला न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयाच्या आवारात जनावरे बांधून प्रशासनाचा निषेध केला.

हुक्केरी तालुक्यातील मास्तीहोळी, जारकीहोळी, बीरनहळ्ळी, सुतगट्टी आणि गुडगनहळ्ळीसह आठ गावांतील शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. एकूण ३९४ एकर २६ गुंठे जमिनीचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. हक्काचा मोबदला देण्याच्या मोबदल्यात भ्रष्ट अधिकाऱ्यांनी २ ते ५ कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा थेट आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे.

अधिकारी मूळ कागदपत्रे बाजूला ठेवून १५० एकर जमीन कमी दाखवणारा खोटा अहवाल तयार करत आहेत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच मोबदल्याची रक्कम आधीच धनादेशाद्वारे दिल्याचे खोटे सांगणाऱ्या अधिकाऱ्यांनी ती रक्कम नेमकी कोणाच्या खात्यावर जमा झाली, याचे पुरावे जाहीर करावेत, असे आव्हान शेतकऱ्यांनी दिले आहे. अधिकाऱ्यांच्या या दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांपर्यंत चुकीची माहिती पोहोचत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.

पालकमंत्री सतीश जारकीहोळी,यांनी वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष करणाऱ्या जलसंपदा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश अम्मिनभावी आणि अभियंता राठोड यांना त्वरित निलंबित करावे, अशी मागणी शेतकरी नेते बाळेश मावनूर यांनी केली आहे. पोलीस बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास शेतकरी मागे हटणार नाहीत, असा इशारा यावेळी देण्यात आला.



Recent Comments