सोशल मीडियावर ट्रोलिंगच्या नावाखाली दलित समाज आणि महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आरोपीविरोधात बेळगावात युवा कर्नाटक भीम सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

फेसबुकवर महादेव ओगस्टार नावाच्या व्यक्तीने, सोनू श्रीनिवास गौडा आणि वर्षिणी यांच्यातील वादात विनाकारण हस्तक्षेप केला. या वादादरम्यान त्याने दलित समाजाचा उल्लेख करत अत्यंत आक्षेपार्ह आणि जातीवाचक शब्दांचा वापर केला. ट्रोलिंगच्या नावाखाली सातत्याने महिलांची बदनामी करणाऱ्या आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या या कृत्याविरोधात भीम सेनेने संताप व्यक्त केला आहे.

युवा कर्नाटक भीम सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण आर. मादर यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव येथील नागरी हक्क अंमलबजावणी संचालनालयाच्या (DCRE) कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. आरोपीवर तातडीने ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, शहर पोलीस आयुक्त आणि डीसीआरईच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात आले.

सोशल मीडियावरून शांतता भंग करणाऱ्या अशा प्रवृत्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करून दलित समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष प्रवीण मादर यांनी केली आहे. या आंदोलनात संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अक्षय के. आर., जिल्हाध्यक्ष मल्लप्पा अक्कमड्डी, सचिन कोलकार यांच्यासह अनेक दलित नेते उपस्थित होते.



Recent Comments