बेळगाव येथील पोलीस आयुक्त कार्यालयाजवळील जिमखाना क्लबमध्ये मंगळवारी रात्री गोळीबार झाला. रमी खेळत असलेल्या सुरेश जालगाकर यांच्यावर पाच जणांच्या टोळीने पूर्ववैमनस्यातून हा
जीवघेणा हल्ला केला.

मंगळवारी रात्री जिमखाना क्लबमध्ये सुरेश जालगाकर रमी खेळत असताना आरोपींनी हा हल्ला केला. पाच आरोपींपैकी दोघांनी बाहेर पाळत ठेवली, तर तिघांनी आत घुसून सुरेश यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी प्रथम बंदुकीच्या दस्ताने त्यांच्या डोक्यावर प्रहार केला आणि त्यानंतर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरेश यांनी आरोपींना ढकलून तिथून पळ काढल्याने त्यांचे प्राण वाचले. सुरेश बाहेर पळाल्यानंतर आरोपींनीही क्लबबाहेर येत हवेत दोन राऊंड गोळीबार केला आणि तेथून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. दरम्यान, पोलिसांनी सुरेश जालगाकर यांना ताब्यात घेऊन कॅम्प पोलीस ठाण्यात नेले व त्यांची चौकशी केली. “पूर्वी प्रफुल्ल पाटील नावाच्या व्यक्तीवर गोळीबार केला होता, त्याच प्रकरणाचा सूड घेण्यासाठी प्रफुल्ल पाटीलच्या माणसांनी हा हल्ला केला,” अशी माहिती सुरेश जालगाकर यांनी पोलिसांना दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेळगावच्या युनियन जिमखाना क्लबमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणासंदर्भात शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी तीव्र कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. या टोळीयुद्ध पार्श्वभूमीवर कॅम्प पोलीस ठाण्यात सध्या दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या प्रकरणात पीडित सुरेश जालगार याने दिलेल्या तक्रारीवरून प्रफुल्ल पाटील व इतरांविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर जिमखाना मॅनेजरने दिलेल्या दुसऱ्या तक्रारीनुसार सुरेश जालगार, राजू कडोळकर, इम्रान पठाण आणि कुंदन यळ्ळूरकर यांच्याविरुद्ध मालमत्तेचे नुकसान आणि गोंधळ घातल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी प्रफुल्ल आणि सुरेश हे दोघेही जुने जुगारी असून, गेल्या वर्षी प्रफुल्लवर झालेल्या हल्ल्यात सुरेश आरोपी असल्याच्या वैमनस्यातून हे कृत्य घडले आहे. अशा समाजकंटकांविरुद्ध तडीपारी किंवा गुंडा कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल आणि नियमांचे उल्लंघन करणारे क्लब तातडीने बंद केले जातील, असे त्यांनी म्हटले आहे.
याच वेळी, बेकायदेशीर धंद्यांमध्ये पोलिसांचा सहभाग किंवा कर्तव्यात कसूर केल्याबाबत विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले असून, हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित किंवा सेवेतून बडतर्फ करण्यात येईल तसेच प्रफुल्ल पाटील याने शिनोळी भागात जुगार सुरू ठेवल्याच्या आरोपाचीही योग्य पडताळणी करून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.


Recent Comments