Uncategorized

एसआयआर प्रक्रियेतील त्रुटी टाळण्यासाठी मनपाची हेल्पलाईन

Share

बेळगाव महानगरपालिका क्षेत्रातील उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेत मतदार हेल्पलाईन केंद्र सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी कार्तिक एम. यांनी दिली आहे.

सोमवारी महानगरपालिका आवारात हेल्पलाईन केंद्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते. बीएलओंकडून देण्यात आलेले सर्वेक्षण अर्ज २९ जुलैपूर्वी बंधनकारकपणे परत करणे आवश्यक आहे. अर्ज भरताना काही अडचण किंवा शंका असल्यास नागरिकांनी हेल्पलाईन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन कार्तिक एम. यांनी केले.

महानगरपालिकेचे महसूल उपायुक्त डॉ. सिद्धू हुल्लोळी यांनी सांगितले की, नागरिकांनी २००२ च्या मतदार यादीचा संदर्भ घेऊनच माहिती भरावी. दक्षिण आणि उत्तर मतदारसंघात ९० टक्के अर्जांचे वाटप पूर्ण झाले असून संगणकीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. नागरिकांच्या सहकार्याने ही प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास डॉ. सिद्धू हुल्लोळी यांनी व्यक्त केला.

तसेच, मनपाचे प्रशासन उपायुक्त उदयकुमार टी. यांनी सांगितले की, अर्ज वाटपात काही अडचण असल्यास वरिष्ठ अधिकारी वॉर्डांना प्रत्यक्ष भेट देऊन समस्या सोडवतील. नागरिकांनी अपूर्ण माहिती न भरता बीएलओ किंवा हेल्पलाईनची मदत घ्यावी, असे आवाहन उदयकुमार टी. यांनी केले. याप्रसंगी मनपा परिषद सचिव लक्ष्मी निप्पाणीकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Tags: