Uncategorized

कागवाडमध्ये संत कुंभार गुंडय्या स्मरणोत्सव सोहळ्याचे आयोजन

Share

कर्नाटकातील २५ लाख लोकसंख्या असलेल्या कुंभार समाजाला सर्वच राजकीय पक्षांनी केवळ मतपेढी म्हणून वापरून दुर्लक्षित ठेवल्याचा आरोप बागलकोट जिल्हा कुंभार समाजाचे अध्यक्ष हुच्चेश कुंभार यांनी केला आहे.

कागवाड तालुक्यातील उगार येथील सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला विजापूर येथील ज्ञानयोगाश्रमाचे अध्यक्ष बसवलिंग स्वामीजी उपस्थित होते. सरकारने कुंभार समाज विकास महामंडळाची स्थापना केली असली, तरी अद्याप निधी दिला नसल्याची खंत हुच्चेश कुंभार यांनी व्यक्त केली.

मातीपासून भांडी बनवून प्रामाणिक जीवन जगणाऱ्या या कष्टकरी समाजाला सरकारने जास्तीत जास्त सवलती दिल्या पाहिजेत आणि पालकांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया बिदर जिल्हा कुंभार समाजाचे अध्यक्ष मल्लिका अर्जुन कुंभार यांनी दिली.

राजकीय पक्षांनी कुंभार समाजाचा केवळ मतांसाठी वापर न करता त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे आवाहन धारवाड येथील महिला नेत्या डॉ. कमलाबाई कुंभार यांनी केले.

तत्पूर्वी, समाजातील सुवासिनींनी कृष्णा नदीची पूजा करून कलश यात्रा काढली आणि महादेव मंदिरात शिवलिंगाला जलाभिषेक केला. या सोहळ्याला डॉ. आनंद कुंभार, सुभाष कुंभार, बसवराज कुंभार यांच्यासह समाजातील अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

Tags: