बेळगावमध्ये हिडकल धरणाच्या जमीन धरणग्रस्तांचे आंदोलन तीव्र झाले आहे. अधिकाऱ्यांची दिरंगाई आणि कोट्यवधी रुपयांच्या लाचेची मागणी होत असल्याचा आरोप करत शेकडो शेतकऱ्यांनी कर्नाटक जलसंपदा महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाला घेराव घातला.


क्लब रोडवरील मुख्य अभियंता कार्यालयासमोर एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. आंदोलनाचे नेतृत्व करणारे बाळेश मावनूर यांनी ३९४ एकर २६ गुंठे जमिनीचा मोबदला अद्याप मिळाला नसल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी मूळ कागदपत्रे बाजूला ठेवून १५० एकर जमीन कमी दाखवून खोटा अहवाल तयार केल्याचा आरोप त्यांनी केला. बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा दावा अधिकारी करत असतील, तर त्यांनी मूळ रेकॉर्ड जाहीर करावा असे आव्हान त्यांनी दिले.


गेल्या १० ते १२ वर्षांपासून न्यायासाठी भटकणाऱ्या शेतकऱ्यांनी, फाईल पुढे पाठवण्यासाठी अधिकारी २ ते ५ कोटी रुपयांची लाच मागत असल्याचा आरोप करत मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवण्यापूर्वी सर्व त्रुटी दूर करून अचूक प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. योग्य अहवाल मिळेपर्यंत कार्यालय सोडणार नसल्याचे सांगत उद्यापासून २२ गावांतील महिला व गुराढोरांसह अहोरात्र ठिय्या मांडण्याचा इशारा धरणग्रस्तांनी दिला आहे.
या आंदोलनात हिडकल धरणग्रस्त भागातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.


Recent Comments