Uncategorized

खानापुरातील आदिवासी आणि कातकरी वस्त्यांमध्ये जि. पं. सीईओंचा दौरा

Share

खानापूर तालुक्यातील हत्तरगुंजी गावातील हक्कीपिक्कीय आदिवासी आणि कातकरी समुदायाच्या वस्तीला बेळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भेट दिली आहे.

या दौऱ्यादरम्यान त्यांनी दोन्ही समुदायांना मूलभूत सोयी-सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे कडक निर्देश संबंधित विभागांना दिले. कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीने या दोन्ही समुदायांच्या हक्कांसाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही प्रशासकीय भेट झाली आहे.

जिल्हा परिषदेचे सीईओ राहुल शिंदे यांनी विविध विभागांच्या उच्च अधिकाऱ्यांसह हत्तरगुंजी येथील इंदिरा नगर वस्तीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी मुलांचे शिक्षण, आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, विविध शासकीय ओळखपत्रे आणि घरकुलाच्या जागा यांसारख्या समस्या जाणून घेऊन त्या तात्काळ सोडवण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

याप्रसंगी दलित संघर्ष समितीचे जिल्हा सरचिटणीस राजशेखर हिंडलगी, तालुकाध्यक्ष राघवेंद्र चलवादी, पंचायत सदस्य रवी मादार यांच्यासह आदिवासी समाजाच्या प्रमुखांनी अधिकाऱ्यांना स्थानिक समस्यांची सविस्तर माहिती दिली.

या दौऱ्यात तालुका पंचायतचे ईओ रमेश मेत्री, समाजकल्याण विभागाचे बसवराज चेन्नैनावर, बीईओ, महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी तसेच पीडीओ रेश्मा पानेवाली उपस्थित होते.

Tags: