Uncategorized

धारवाड कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Share

कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने घोषित केलेल्या कृषी अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी पदभरतीत बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना संधी दिल्याच्या विरोधात धारवाड येथील कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

धारवाड कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर विद्यार्थ्यांनी एकत्र येत केईए प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. कृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी ही पदे केवळ कृषी शाखेच्या पदवीधरांसाठीच राखीव असायला हवीत, असे स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी या निर्णयाचा विरोध केला आहे.

केईएने जाहीर केलेल्या ९४५ कृषी अधिकारी पदांसाठी बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची मुभा दिली आहे. कृषी शाखेचे विद्यार्थी रावे, पीकशास्त्र, कीटकशास्त्र आणि वनस्पतीरोगशास्त्र यांसारख्या विषयांचा सखोल अभ्यास करतात. मात्र, या पदांवर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आल्यास शेतकऱ्यांना योग्य तांत्रिक मार्गदर्शन मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली. याशिवाय मान्यता नसलेल्या काही खाजगी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनाही यात संधी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

घोषित केलेली परीक्षा प्रक्रिया तातडीने स्थगित करून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना या भरतीतून वगळेपर्यंत हे आंदोलन चालूच ठेवण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

Tags: