Belagavi

२६ जुलै रोजी होणार ‘बेळगाव मान्सून अल्ट्रा २०२६’ मॅरेथॉन

Share

‘बेळगाव एंड्युरन्स स्पोर्ट्स’च्या वतीने आगामी २६ जुलै रोजी ‘बेळगाव मान्सून अल्ट्रा २०२६’ मॅरेथॉनच्या चौथ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शर्यतीचे संचालक डॉ. संजीव गुडगनट्टी यांनी दिली. बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या स्पर्धेबाबत सविस्तर माहिती दिली.

ही शर्यत गोजगा गावापासून सुरू होऊन महाराष्ट्रातील शिनोळीपर्यंत पार पडणार आहे. यामध्ये ५० किलोमीटर, २५ किलोमीटर, १३ किलोमीटर आणि ७ किलोमीटर असे चार गट निश्चित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या स्पर्धेला ‘आन्तरराष्ट्रीय ट्रेल रनिंग असोसिएशन’ची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे ५० आणि २५ किलोमीटर गटातील धावपटूंना आंतरराष्ट्रीय मानांकन गुण मिळणार आहेत. या स्पर्धेत देशभरातून ५०० हून अधिक धावपटू सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे आयजीपी आणि ‘आयर्न मॅन फिनिशर’ संदीप पाटील हे स्वतः २५ किलोमीटर गटात धावणार आहेत. या मॅरेथॉनचे आयोजन पूर्णपणे प्लास्टिकमुक्त आणि कपलेस पद्धतीने करण्यात आले आहे. धावपटूंनी स्वतःचे हायड्रेशन पॅक किंवा पाण्याच्या बाटल्या सोबत ठेवणे अनिवार्य असून, मार्गामध्ये पाणी भरून घेण्यासाठी रिफिलिंगची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्पर्धकांच्या सुरक्षेसाठी वैद्यकीय पथक आणि दोन रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या असून, नोंदणीकृत धावपटूंना टी-शर्ट, पदक, बिब्स आणि पौष्टिक आहार दिला जाणार आहे.

यावेळी बोलताना राजू नायक यांनी सांगितले की, ही संस्थेची चौथी आवृत्ती आहे. कर्नाटकच्या गोजगा गावाहून सुरू होऊन महाराष्ट्रातील शिनोळीमार्गे पुन्हा गोजगा येथे या शर्यतीचा समारोप होणार आहे. सह्याद्रीच्या खडतर पर्वतरांगा, मुसळधार पाऊस आणि धुक्याची चादर अशा आव्हानात्मक वातावरणात ही थरारक शर्यत पार पडणार आहे. यामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील धावपटूंचा मोठा सहभाग असेल.

या पत्रकार परिषदेला डॉ. संदीप बामने आणि संस्थेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: