Belagavi

बंगळुरूमध्ये फेरीवाल्यांसाठी निश्चित जागा दिली जाणार

Share

बंगळुरू शहरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि फेरीवाल्यांवर करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या आणि वाहनांच्या दळणवळणाला कोणताही अडथळा न ठरता फेरीवाल्यांना व्यवसाय करता यावा, यासाठी प्रशासन योग्य जागा उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

बेळगाव येथील सर्किट हाऊस येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले की, आपण बंगळुरू नगरविकास मंत्री असताना सर्वपक्षीय आमदारांची बैठक घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली होती. शहरात सुमारे ६० हजार लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यापैकी ३० हजार लोक हातगाडीवर व्यवसाय करण्यास तयार आहेत. या सर्वांना वाहतुकीला अडथळा न ठरणाऱ्या निश्चित जागांवर वाहने देऊन व्यवसायाची सोय केली जाईल. मंत्री कृष्णभैरेगौडा यांनी घेतलेला निर्णय वैयक्तिक नसून, बंगळुरूचे आमदार आणि पोलीस प्रशासनाने एकत्रित चर्चा करूनच हा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. फेरीवाल्यांनी हातगाडीवर व्यवसाय करून पुढे निघून जाणे अपेक्षित आहे, त्यांनी रस्त्याच्या कडेला कायमस्वरूपी टेंट किंवा शेड उभारून नागरिकांन त्रास देऊ नये, असा कडक इशारा मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिला.

याच वेळी राज्यातील इतर राजकीय घडामोडींवर बोलताना मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले की, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सरकारवर कोणताही दबाव नाही. या संदर्भात दिल्लीला जाऊन हायकमांडच्या नेत्यांशी चर्चा केली जाईल. बेळगावमध्ये सुरू असलेली आरएसएसची बैठक आणि आमदारांच्या मागणीनुसार राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत चाचपणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय, कित्तूर कर्नाटक भागातील सुवर्णसौध अंतर्गत येणाऱ्या धार्मिक दत्ती विभागाच्या मंदिरांमधील दानपेट्यांवर सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. बेळगावसाठी विशेष निधी देण्याच्या प्रश्नावर, “मी आताच आलो आहे, परिस्थितीची पाहणी करून निर्णय घेऊ”, असे उत्तर त्यांनी दिले.

Tags: