उगार साखर कारखान्याच्या विकासाला दूरदृष्टी आणि शिस्तबद्ध प्रशासनाच्या जोरावर नवी दिशा देणारे राजाभाऊ शिरगांवकर यांनी भारतीय साखर उद्योगात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र भाजप महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा नीता केळकर यांनी केले.


बुधवारी संध्याकाळी उगार येथील विहार सभागृहात शिरगांवकर कुटुंबिय आणि उगार साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक चंदन शिरगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शोकसभा पार पडली. या सभेत शेतकरी, विविध संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक आणि नागरिकांनी उपस्थित राहून राजाभाऊ शिरगांवकर यांना श्रद्धांजली वाहिली.

यावेळी नीता केळकर यांनी सांगितले की, राजाभाऊ शिरगांवकर यांनी केवळ कारखान्याचा विकास केला नाही, तर शेतकरी, कामगार आणि अनेक शैक्षणिक संस्थांना सातत्याने मदत केली. त्यांनी उगार लायन्स क्लब आणि सांगलीच्या नूतन बुद्धिबळ संस्थेची स्थापना करून सामाजिक कार्यात मोठे योगदान दिले आहे.
राजाभाऊ शिरगांवकर यांच्या नेतृत्वात उगार कारखाना केवळ साखर उत्पादनापुरता मर्यादित न राहता सहवीज निर्मिती, इथेनॉल उत्पादन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यात देशात आघाडीवर राहिला. त्यांच्या दूरदृष्टीमुळे कारखान्याची कीर्ती राष्ट्रीय पातळीवर पोहोचली, अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
राजाभाऊंनी शेतकरी हित, कामगार कल्याण आणि उद्योगाच्या विकासाला दिलेले प्राधान्य आजही आदर्शवत आहे. त्यांच्या निधनाने साखर उद्योगाने एक अनुभवी मार्गदर्शक गमावला असून त्यांची मानवी मूल्ये पुढील पिढीला प्रेरणादायी राहतील, असे वीरभद्र कटगेरी, रामचंद्र थोराशे, रामचंद्र किल्लेदार, प्राचार्य मेघना कुलकर्णी, विनायक कांबळे, बाळासाहेब विसापुरे, बी. एन. जोशी, ॲड. राहुल कटगेरी, जगदीश पटवर्धन, सिद्धराम मोटगी आणि अण्णाप्पा माळी यांनी म्हटले. या शोकसभेत सर्व मान्यवरांनी राजाभाऊ शिरगांवकर यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.


Recent Comments