Chikkodi

एकसंबा येथे प्लास्टिक दुकानाला भीषण आग

Share

चिकोडी तालुक्यातील एकसंबा शहरात मध्यरात्री एका प्लास्टिक आणि पीव्हीसी पाईपच्या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत ‘समृद्धी प्लास्टिक अँड पीव्हीसी पाईप्स’ हे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

एकसंबा येथील उद्योजक माणिक वडगांवे यांच्या मालकीच्या समृद्धी प्लास्टिक दुकानाला अचानक आग लागली. दुकानात प्लास्टिकच्या वस्तू आणि पीव्हीसी पाईप्स असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण दुकानाला धुराचा वेढा पडला.

दुकानातून मोठा धूर आणि आगीच्या ज्वाला निघत असल्याचे पाहून स्थानिक नागरिकांनी तात्काळ दुकान मालक आणि अग्निशामक दलाला पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक लोकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले.

या आगीत दुकानातील लाखो रुपयांचे प्लास्टिक साहित्य आणि पीव्हीसी पाईप्स जळून खाक झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही घटना मध्यरात्री घडल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

डी. के. उप्पार, इन न्यूज, चिकोडी

Tags: