Chikkodi

महाराष्ट्रात उसाला प्रतिटन ४,२०० रुपये दर जाहीर; राजू शेट्टींचे आंदोलन मागे

Share

महाराष्ट्रातील ऊसदराचा तिढा अखेर सुटला असून, उसाला प्रतिटन ४,२०० रुपये दर देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले शेतकरी आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या बैठकीत हा तोडगा निघाला. राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी दराची अधिकृत घोषणा केली. ठरलेली रक्कम तीन टप्प्यांत देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात प्रतिटन ३,९०० रुपये, दुसऱ्या टप्प्यात १०० रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात २०० रुपये देण्याचे ठरले आहे.

योग्य ऊसदराच्या मागणीसाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन उभारण्यात आले होते. सरकार आणि कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत दरवाढ जाहीर केल्याने राजू शेट्टी यांनी आंदोलन अधिकृतपणे मागे घेतले.

या निर्णयामुळे महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, ऊस गाळप हंगाम सुरळीत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Tags: