Belagavi

आगामी काळात मी नक्कीच मंत्री होणार: आमदार अशोक पट्टण

Share

आगामी काळात मंत्रिमंडळ विस्तारात मला नक्कीच मंत्रीपद मिळेल, असा ठाम विश्वास रामदुर्गचे आमदार अशोक पट्टण यांनी व्यक्त केला आहे. तसेच राजकारणात जातीपेक्षा पक्षनिष्ठेला सर्वाधिक प्राधान्य दिले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.

बेळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अशोक पट्टण यांनी सांगितले की, जिल्ह्याचा विकास, दुष्काळी परिस्थिती आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्या निवारणासाठी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली आहे. यावेळी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना ते म्हणाले की, आगामी दिवसांत बेळगाव जिल्ह्याला किमान तीन ते चार मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून आपल्यालाही मंत्रीपद मिळेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

सध्याच्या राजकारणात उपजातींचे राजकारण वाढत असल्यामुळे आपल्याला काही प्रमाणात फटका बसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. आपण सुरुवातीपासूनच सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्याशी चांगले संबंध राखून आहोत. त्यामुळे पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या ज्येष्ठ आमदारांना मंत्रीपद मिळावे, अशी आपली मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असून निष्ठावंतांना योग्य स्थान मिळेल, अशी प्रतिक्रिया अशोक पट्टण यांनी दिली.

Tags: