Belagavi

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे बेळगावात जंगी स्वागत

Share

मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर डी. के. शिवकुमार यांचे आज पहिल्यांदाच बेळगावात आगमन झाले. यावेळी जिल्हा प्रशासन, काँग्रेस पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

सुवर्णसौधकडे जात असताना सांबरासह विविध मार्गांवर मुख्यमंत्र्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली, तसेच जेसीबीच्या साहाय्याने सफरचंदाचा भव्य हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.

सांबरा विमानतळावर मुख्यमंत्र्यांना बेळगाव शहर पोलिसांतर्फे मानवंदना (गार्ड ऑफ ऑनर) देण्यात आली. विमानतळाबाहेर जमलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी ‘डी. के. डी. के.’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी मंत्री सतीश जารकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार आसिफ सेठ, अशोक पट्टण, महेंद्र तमण्णावर, विधान परिषद सदस्य चन्नराज हत्तीहोळी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर मुख्यमंत्री इतर नेत्यांसह एकाच कारमधून बेळगाव शहराकडे रवाना झाले.

सुवर्णसौधकडे जाणाऱ्या मार्गावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी व चाहत्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा उत्साह साजरा केला. रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या जनसमुदायाने मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. लोकांचा हा उत्साह पाहून मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनीही चालत्या कारमधून बाहेर येत हात उंचावून जनतेचे अभिवादन स्वीकारले आणि आभार मानले.

Tags: