Chikkodi

चिकोडीत कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ

Share

महाराष्ट्रातील कोकण भागात मान्सूनचा पाऊस सक्रिय झाल्यामुळे कर्नाटकच्या सीमाभागातील नद्यांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे.

चिकोडी तालुक्यातील कल्लोळ गावाजवळून वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून, नदीकाठचे प्रसिद्ध दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाट आणि कोकण परिसरात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा, वेदगंगा आणि दूधगंगा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सध्या कृष्णा नदीत १ लाख ३५ हजार क्युसेक वेगाने पाणी येत असून, नदीची पातळी तासातासाला वाढत आहे.

कल्लोळ गावातील कृष्णा नदीकाठच्या प्रसिद्ध दत्त मंदिराच्या आत पाणी शिरल्याने मंदिर जलमय झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक नागरिक आणि भाविकांसाठी सध्यातरी दत्तात्रेय देवाचे दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.

पर्यटकांनी नदीकाठच्या भागात जाऊ नये यासाठी पोलिसांनी नदीकिनाऱ्यावर ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावले आहेत. नदीच्या जवळ जाण्यास नागरिकांना सक्त मनाई करण्यात आली आहे.

— डी. के. उप्पार, इन न्यूज , चिक्कोडी

Tags: