बेळगाव येथील कॅम्प भागातील महिला पोलीस ठाण्यासमोरील पदपथावर गेल्या दोन-तीन वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत राहणाऱ्या दोन वयोवृद्ध महिलांच्या राहण्याचा प्रश्न अखेर दिवंगत माजी आमदार संभाजी पाटील यांच्या पत्नीने दाखवलेल्या दातृत्वामुळे मार्गी लागला आहे.

पावसाळ्यात ताडपत्रीच्या आडोशाला दिवस काढणाऱ्या या महिलांची बिकट अवस्था पाहून माजी आमदार ॲड. अनिल बेनके यांनी त्यांची भेट घेतली होती व त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. दिलेले आश्वासन पूर्ण करत अनिल बेनके यांनी माजी महापौर विजय मोरे यांच्याशी संपर्क साधला. या दोघांच्या विनंतीला मान देऊन दिवंगत संभाजी पाटील यांच्या पत्नीने कॅम्प परिसरातील आपल्या मालकीच्या दोन खोल्या या वृद्ध महिलांना विनाशुल्क राहण्यासाठी दिल्या. त्यांच्या या संवेदनशील निर्णयाचे संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे.

माजी आमदार ॲड. अनिल बेनके म्हणाले, “सोशल मीडियातून माहिती मिळताच मी या वृद्ध महिलांची भेट घेतली. त्यांचा निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मी माझे मित्र माजी महापौर विजय मोरे यांच्याशी संपर्क साधला. आमच्या प्रयत्नांना यश आले असून, माजी आमदार स्वर्गीय संभाजी पाटील यांच्या पत्नीने त्यांच्या मालकीच्या दोन खोल्या या महिलांसाठी विनाशुल्क उपलब्ध करून दिल्या आहेत.”
माजी महापौर विजय मोरे यावेळी बोलताना म्हणाले, “या महिलांना यापूर्वी आम्ही वृद्धाश्रमात राहण्याचा पर्याय दिला होता, मात्र त्यांनी नकार दिला. स्थानिकांनी त्यांना मुंबईला भावाकडेही पाठवले, पण तिथेही त्यांचा सांभाळ झाला नाही. अखेर आम्ही दिवंगत संभाजी पाटील यांच्या पत्नीची भेट घेतली आणि त्यांनी तात्काळ आपल्या मालकीच्या दोन खोल्या देत दातृत्वाचे दर्शन घडविले आहे.
अक्का पथकाच्या प्रतिनिधींनी देखील अनिल बेनके, विजय मोरे यांच्यासहित दिवंगत संभाजी पाटील यांच्या पत्नीचेही आभार मानले.
यावेळी कॅम्प महिला पोलीस स्थानकाच्या कर्मचारी, अक्का पथकाच्या प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments