Belagavi

अलारवाडच्या तरुणांनी श्रमदानातून बुजवले रस्त्यावरील खड्डे

Share

बेळगाव महापालिका क्षेत्राला जोडणाऱ्या अलारवाड येथील स्थानिक तरुणांनी प्रशासकीय अनास्थेविरोधात स्वतः पुढाकार घेत रस्त्यावरील खड्डे बुजवून सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.

बेळगाव शहरातील जुना पी.बी. रस्ता ते येडियुरप्पा मार्ग होऊन राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा सर्विस रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून पूर्णपणे खराब झाला होता. त्यातच गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे या रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली असून, रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत होती आणि सातत्याने किरकोळ अपघात घडत होते. या समस्येबाबत स्थानिक नागरिकांनी अनेकदा महापालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडे तक्रारी केल्या, मात्र प्रशासनाकडून याची कोणतीही दखल घेतली गेली नाही.

प्रशासनाच्या या उदासीनतेला कंटाळून अखेर अलारवाड गावातील तरुण एकत्र आले. त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून श्रमदानातून सर्व खड्डे बुजवले आणि वाहतूक सुकर केली. प्रशासनाची वाट न पाहता तरुणांनी केलेल्या या कौतुकास्पद कार्याबद्दल संपूर्ण परिसरातून आणि ग्रामस्थांकडून त्यांचे मोठे कौतुक होत आहे.

Tags: