स्वतः डीएसपी असल्याचे भासवून आणि पोलिसांचा गणवेश परिधान करून तरुणांना पोलीस, पीएसआय आणि जेलरच्या नोकऱ्या लावण्याचे अमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका संशयिताला विजापूर जिल्हा पोलिसांनी अटक केली आहे. हा संशयित अपहरण आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात गेल्या १२ वर्षांपासून फरार होता.

ग्याननगौडा ऊर्फ ज्ञानगौडा ऊर्फ गणेश ऊर्फ सी. संपतकुमार (वय ३१, रा. वरगोडदिन्नी, ता. हुनगुंद, जि. बागलकोट) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयिताने २०१२ मध्ये विजापूर येथील विठ्ठल छायगोळ यांच्या नातेवाइकाला पोलीस दलात नोकरी लावण्याचे अमिष दाखवून १.२० लाख रुपये उकळले होते. त्यानंतर पैसे परत मागितल्याने २०१४ मध्ये त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने विठ्ठल यांचे अपहरण केले होते. त्यांना बेड्या ठोकून, पाय बांधून गोणपाटात भरून कोप्पळ जिल्ह्यातील हुलगी जवळील कालव्यात फेकून देऊन खुनाचा प्रयत्न केला होता.

या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर जामीन मिळवून संशयित बाहेर आला आणि त्यानंतर न्यायालयाच्या सुनावणीला गैरहजर राहून १२ वर्षे फरार झाला. यादरम्यान त्याने मुद्देबिहाळ तालुक्यातील हंद्राळ येथील एका व्यक्तीच्या मुलाला जेलरची नोकरी लावण्याचे अमिष दाखवून ८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आणखी एक गुन्हा केला होता.
एपीएमसी पोलीस ठाण्याचे पीएसआय बसवराज तिप्परेड्डी यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे ६ जुलै रोजी बंगळुरू येथून संशयिताला अटक करून न्यायालयात हजर केले. संशयिताविरुद्ध मुद्देबिहाळ, एपीएमसी, आदर्श नगर आणि ताळीकोटी पोलीस ठाण्यात एकूण पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी दिली आहे.


Recent Comments