खानापूर शहर आणि तालुका परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील पारिश्वाड क्रॉसजवळ जोरदार वाऱ्यामुळे एक झाड कोसळल्याने विजेचा खांब तुटून पडला असून, परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.

खानापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा पाऊस सक्रिय आहे. मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांच्या कडेला असलेली जुनी आणि वाळलेली झाडे वाऱ्यामुळे उन्मळून पडत असल्याने वाहनधारक आणि पादचाऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. पारिश्वाड क्रॉस जवळील या घटनेमुळे काही काळ वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता.

अचानक घडलेल्या या घटनेनंतर वीज वितरण कंपनीच्या (हेस्कॉम) कर्मचाऱ्यांनी तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. रस्त्यावरील झाड आणि विजेचा खांब बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
पावसाळा लक्षात घेता प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून रस्त्याच्या कडेला असलेली धोकादायक झाडे आणि फांद्या तातडीने छाटाव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. जेणेकरून भविष्यातील संभाव्य अपघात टाळता येतील आणि वाहतूक सुरळीत राहील.


Recent Comments