बेळगाव ग्रामीणमधील शिंदोळी आणि बडाल अंकलगी गावांत राज्यसभा खासदार निधीतून नव्याने उभारलेल्या आधुनिक प्रवासी बस स्थानकांचे उद्घाटन माजी खासदार इराण्णा कडाडी यांच्या हस्ते करण्यात आले. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी सोय होणार आहे.


ग्रामीण भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तसेच ग्रामस्थांना हक्काचे बस स्थानक नसल्याने पाऊस आणि उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. स्थानिक नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन माजी खासदार इराण्णा कडाडी यांनी आपल्या निधीतून तातडीने रक्कम उपलब्ध करून दिली. त्यामुळे या दोन्ही गावांमध्ये प्रवाशांसाठी सुसज्ज आणि आधुनिक बस स्थानके उभी राहिली आहेत.


जेव्हा विकासकामे केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष तळागाळापर्यंत पोहोचतात, तेव्हाच लोकशाहीला खरा अर्थ प्राप्त होतो, असे इराण्णा कडाडी यांनी म्हटले. खासदार निधीतील प्रत्येक पैशाचा वापर अत्यंत पारदर्शकपणे आणि जनहितार्थ करण्यात आला असून आगामी काळातही ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आपण सदैव सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
योग्य बस स्थानकाच्या अभावी या दोन गावांमधील नागरिकांना दररोज विविध समस्यांचा सामना करावा लागत होता, अशी प्रतिक्रिया भाजप बेळगाव ग्रामीण मंडळाचे माजी अध्यक्ष धनंजय जाधव यांनी दिली. खासदार इराण्णा कडाडी यांनी निधी मंजूर करण्यासोबतच संबंधित यंत्रणांशी सतत संपर्क ठेवून काम विहित वेळेत पूर्ण करून घेतले, असे सांगत त्यांनी खासदारांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. तसेच ही सार्वजनिक मालमत्ता स्वच्छ राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या उद्घाटन प्रसंगी शिंदोली गावचे पंचायत अध्यक्ष सतीश शहापूरकर, सदस्य बाबागौडा पाटील, पिराजी अनागोळकर, सविता मुचंडी, पिराजी कनबर्गी यांच्यासह बडाल अंकलगी गावचे मरेप्पा शहापूरकर, अशोक चापगावी, पिंटू कामतगी तसेच स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments