गेल्या काही तासांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळेचिक्कोडीमधील न्यायालय परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे. पाण्याच्या निचऱ्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने संपूर्ण आवारात गुडघाभर पाणी साचले असून वकील आणि नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे.

न्यायालयाच्या कामकाजासाठी आलेल्या नागरिकांना आणि वकिलांना याच साचलेल्या पाण्यातून वाट काढत जावे लागले. प्रत्येक वेळी पाऊस पडल्यानंतर या भागात अशीच परिस्थिती निर्माण होत असूनही कायमस्वरूपी गटार व्यवस्था न केल्यामुळे स्थानिक प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

परिस्थितीचे गांभीर्य पाहून कर्मचाऱ्यांनी तातडीने जेसीबी यंत्र मागवून पाण्याचा निचरा करण्यासाठी तात्पुरता मार्ग करून दिला. सध्या पाण्याचा निचरा करण्यासाठी तात्पुरती उपाययोजना करण्यात आली असली तरी पाऊस असाच सुरू राहिल्यास समस्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन न्यायालय परिसरातील पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा कायमस्वरूपी दुरुस्त करावी अशी मागणी चिकोडीच्या नागरिकांनी केली आहे.


Recent Comments