Chikkodi

कृष्णा आणि दूधगंगा नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ

Share

महाराष्ट्रातील पश्चिम घाटात मान्सूनचा पाऊस सक्रिय झाल्याने त्याचा थेट परिणाम चिक्कोडी तालुक्यातील नद्यांवर झाला आहे. पश्चिम घाटातील वाढलेल्या पावसामुळे कृष्णा, दूधगंगा आणि वेदगंगा या प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत एकाच दिवसात तब्बल ५ फुटांची वाढ झाली आहे.

नद्यांची पाणीपातळी अचानक वाढल्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण कोरडी पडलेली कृष्णा नदी आता महाराष्ट्रातील पावसामुळे भरून वाहू लागली आहे. नदीचे पात्र वेगाने भरत असून पाण्याचा प्रवाह धोक्याच्या पातळीकडे सरकत आहे. सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने चिंतेत असलेल्या नागरिकांना नदीत पाणी आल्याने दिलासा मिळाला असला, तरी पाण्याचा वाढता वेग पाहून पूर येण्याची भीती निर्माण झाली आहे.

पश्चिम घाटातील पाऊस असाच सुरू राहिल्यास नद्या धोक्याची पातळी ओलांडतील आणि धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवावा लागेल. ज्यामुळे चिक्कोडी तालुक्यातील सखल भाग आणि नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरण्याची तसेच पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

डी. के. उप्पार
इन् न्यूज, चिक्कोडी.

Tags: