पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन जाणीवपूर्वक तोडल्याचा आरोप करत, न्याय न मिळाल्यास दयामरण आंदोलन करण्याचा इशारा बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील सवदी दाम्पत्याने दिला आहे.

मंजुनाथ रुद्रप्पा सवदी आणि श्रुती मंजुनाथ सवदी या दांपत्याने कित्तूर तहसीलदारांकडे सदर मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या घराचे पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन नगर पंचायत सदस्य आणि कर्मचाऱ्यांनी उद्देशपूर्वक बंद केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या संदर्भात संबंधित अधिकारी आणि विभागाकडे अनेकवेळा दाद मागूनही अद्याप न्याय मिळाला नसल्याचे या दांपत्याने म्हटले आहे. पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधेपासून वंचित राहावे लागल्यामुळे संपूर्ण कुटुंब संकटात सापडले असून, प्रचंड मानसिक आणि आर्थिक ताणाचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आपल्यावर झालेला अन्याय तातडीने दूर करून पाणी पुरवठा पूर्ववत करण्यात यावा, अन्यथा ६ जुलैपासून कित्तूर नगर पंचायत कार्यालयासमोर दयामरण सत्याग्रह सुरू करण्याचा इशारा दांपत्याने दिला आहे.


Recent Comments