Chikkodi

झोपाळ्यावर खेळताना गळफास लागून १४ वर्षांच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

Share

निपाणी तालुक्यातील कोडोली गावात बुधवारी संध्याकाळी साडीच्या झोपाळ्यावर खेळत असताना एका ८ वीतील विद्यार्थिनीचा गळफास लागून दुर्दैवी मृत्यू झाला. शुभ्रा युवराज राऊत-पाटील (वय १४) असे मृत मुलीचे नाव आहे.

मृत शुभ्रा ही श्रीपेवाडी येथील श्री जी. एम. संकपाळ हायस्कूलमध्ये शिकत होती. बुधवारी मुसळधार पावसामुळे शाळांना सुटी असल्याने शुभ्रा आपल्या दोन लहान बहिणींसह घरीच होती. तिचे आई-वडील शेतीच्या व इतर कामासाठी बाहेर गेले होते. तर आजी पंढरपूर यात्रेला गेल्यामुळे घरी केवळ आजोबा उपस्थित होते.

संध्याकाळच्या सुमारास शुभ्रा घरात बांधलेल्या साडीच्या झोपाळ्यावर बसून खेळत होती. खेळताना झोपाळा अचानक वेगाने गोल फिरल्याने साडीचा भाग तिच्या गळ्याभोवती घट्ट आवळला गेला. झोपाळा उंचावर असल्याने तिचे पाय जमिनीला टेकू शकले नाहीत आणि गळफास अधिकच घट्ट झाला.

हा प्रकार लक्षात येताच आजोबांनी तातडीने आरडाओरड केली. शेजाऱ्यांच्या मदतीने शुभ्राला निपाणीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच निपाणी ग्रामीण पोलीस आणि बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक महात्मा गांधी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शुभ्राच्या अशा अचानक जाण्याने कोडोली गावात शोककळा पसरली आहे.

Tags: