गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आमदार आसिफ सेठ यांच्या नेतृत्वाखालील एआरएस फाउंडेशनने मदतीचा हात दिला आहे. खंजर गल्ली येथील सरकारी उर्दू शाळेत विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करून त्यांच्या उच्च शिक्षणासाठी प्रेरणा देण्यात आली.


बेळगाव उत्तर विधानसभा क्षेत्राचे आमदार आसिफ सेठ यांच्या वतीने या कार्यक्रमात सहभागी झालेले तरुण नेते अमान सेठ यांनी विद्यार्थ्यांना ६०० वह्यांचे वाटप केले आणि मुलांशी आपुलकीने संवाद साधला. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून शिक्षण घ्यावे आणि उपलब्ध संधींचा योग्य वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. याच वेळी एआरएस फाउंडेशनच्या महत्त्वाकांक्षी ‘एसएसएलसी स्कॉलरशिप योजने’बद्दल माहिती देताना त्यांनी, आगामी परीक्षेत ९० आणि ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती देऊन सन्मानित केले जाईल, असे जाहीर केले.


ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात निरंतर पाठबळ देत असून, यापुढेही पात्र विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी सदैव पाठीशी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक, पालक, स्थानिक नेते आणि फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments