Belagavi

बेळगाव कित्तूर धारवाड रेल्वे भूसंपादनावरून शेतकरी आक्रमक

Share

बेळगाव-कित्तूर-धारवाड या नवीन रेल्वे मार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेमुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. आपली सुपीक जमीन जात असताना अत्यंत कमी मोबदला मिळत असल्याचा आरोप करत बाधित शेतकऱ्यांनी बेळगावचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन त्यांना आपल्या प्रमुख मागण्यांचे निवेदन सादर केले.

या रेल्वे मार्गासाठी जमीन गमावणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशासनाकडून प्रति एकर अवघी ३५ ते ४५ लाख रुपये भरपाई निश्चित करून नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. मात्र, सध्या खुल्या बाजारपेठेत या जमिनीचा दर प्रति एकर २ ते ३ कोटी रुपये इतका आहे. या नाममात्र भरपाईमुळे शेतकरी कुटुंबे आर्थिक संकटात सापडण्याची भीती निर्माण झाली आहे.

जमीन गमावणाऱ्या शेतकरी कुटुंबातील एका सदस्याला रेल्वे विभागात सरकारी नोकरी देण्यात यावी, जमिनीला वाढीव मोबदला मिळावा आणि कागदपत्रांच्या प्रशासकीय प्रक्रियेचा खर्च रेल्वे विभागानेच करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी जगदीश शेट्टर यांच्याकडे केली आहे.

या प्रसंगी पाटील, शशिशेखर रोट्टी, बसवराज कडेमणी, गौसमोद्दीन जालीकोप्प, शिवरुद्र अरळीकट्टी, सुरेश गुरवण्णावर यांच्यासह इतर शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

Tags: