Belagavi

बेळगाव शहर परिसरात वाढला पावसाचा जोर

Share

बेळगाव शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोर पकडला असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

जून महिन्यात पावसाने दडी मारल्यानंतर अखेर मृग नक्षत्राच्या उत्तराधार्थ पावसाने जोर पकडला आहे. पावसामुळे बळीराजा सुखावला असून तालुक्यात खरीप हंगामाच्या कामात शेतकरी व्यस्त आहेत. मात्र शहरी भागात या पावसामुळे पहिल्या दोनच दिवसात व्यवस्था कोलमडली असून सखल भागात पाणी साचण्यासहीत वाहतुकीलाही बोजवारा उडाला आहे. कुमारस्वामी लेआउट, संगमेश्वर नगर यासह अनेक ठिकाणी वृक्षांची पडझड झाली असून या भागातील वाहतूक कोलमडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पावसाळ्याच्या आगमनापूर्वीच पालिका प्रशासनाने धोकादायक झाडांच्या फांद्या छाटणे आणि संभाव्य आपत्ती ओळखून यावर उपाययोजना करणे गरजेचे होते. मात्र पालिका प्रशासन नेहमीप्रमाणेच व्यवस्थापनात फोल ठरल्याने अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाल्याचे चित्र दिसून येत आहे. कुमारस्वामी लेआउट, संगमेश्वर नगर या भागात पडझड झालेल्या झाडांच्या फांद्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने बाजूला सारून रस्ता वाहतुकीसाठी खुला जरी केला असला तरी आधीच योग्य उपाययोजना न राबविल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

दोन दिवसात संपूर्ण बेळगावनागरी वातावरणातील गारवा अनुभवत असून रेनकोट, छत्र्या घेऊन नागरिक दैनंदिन कामकाजात व्यस्त झाल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे.

Tags: