खानापूर-हल्याळ राज्य महामार्गावरील नंदगड जवळील बिडी रस्त्यावर अचानक मोठे झाड कोसळल्याने एक वृद्ध गंभीर जखमी झाला असून दोन दुचाकींचे नुकसान झाले आहे. वनविभाग आणि पोलिसांनी तातडीने संयुक्त मोहीम राबवून रस्ता मोकळा केला.


खानापूर जवळील नंदगड-बिडी रस्त्यावरील संगोळ्ळी रायण्णा चौकात असलेला जुनाट वृक्ष अचानक मुख्य रस्त्यावर कोसळले. या दुर्घटनेत नरसेवाडी गावातील रहिवासी पुंडलिक देवप्पा पाटील हे वृद्ध गंभीर जखमी झाले. त्यांच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने नंदगड येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. झाड कोसळल्यामुळे महामार्गावरील दोन विजेचे खांब आणि दोन दुचाकींचे पूर्णतः नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार शिवकुमार तुरमुरी यांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.


त्यानंतर नंदगड उप-परिक्षेत्र वनअधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार वनविभागाच्या पथकाने जेसीबी व कटरच्या साहाय्याने रस्त्यावरील झाड बाजूला केले. यामुळे विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत झाली. पावसाळ्यापूर्वीच अशा सुकलेल्या झाडांची विल्हेवाट लावण्यात वनविभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी आक्रोष व्यक्त केला असून प्रशासनाने भविष्यात काळजी घ्यावी, अशी मागणी केली आहे.


Recent Comments