Belagavi

बेळगावात मराठी अस्मितेसाठी निवडणूक कर्मचाऱ्यांना माघारी धाडले

Share

बेळगावसह सीमाभागात सध्या निवडणूक विभागाकडून मतदार यादी फेरनिरीक्षण प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेअंतर्गत घरोघरी जाऊन कर्मचाऱ्यांकडून अर्ज दिले जात आहेत. मात्र, प्रशासनाकडून हे अर्ज केवळ कन्नड भाषेत उपलब्ध करून दिले जात असल्याने सीमाभागातील मराठी भाषिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या प्रक्रियेचा भाग म्हणून बेळगावमधील भांदूर गल्ली येथे निवडणूक आयोगाचे कर्मचारी अर्ज वाटपासाठी आले होते. त्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी नगरसेवक सुनील बाळेकुंद्री यांना कन्नड भाषेतील अर्ज दिला. मात्र, बाळेकुंद्री यांनी आपल्याला कन्नड भाषा अवगत नसून, हे अर्ज मराठीतच उपलब्ध करून द्यावेत अशी ठाम मागणी अधिकाऱ्यांकडे केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी सध्या अर्ज फक्त कन्नडमध्येच उपलब्ध असल्याचे सांगितले, त्यावर सुनील बाळेकुंद्री यांनी ते अर्ज स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला.

निवडणूक आयोगाने यापूर्वी बेळगावसह सीमाभागात सर्व निवडणूक अर्ज, परिपत्रके आणि इतर प्रक्रिया कन्नडसह मराठीतही राबविल्या आहेत. भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कानुसार सन २००८ मध्ये तसा स्पष्ट आदेशच आयोगाने काढला आहे, याची आठवण बाळेकुंद्री यांनी अधिकाऱ्यांना करून दिली. जोपर्यंत मराठीत अर्ज मिळत नाहीत, तोपर्यंत प्रक्रिया पुढे जाऊ देणार नाही अशी भूमिका घेत त्यांनी केवळ कन्नड अर्ज घेऊन आलेल्या अधिकाऱ्यांना माघारी पाठवले. या घटनेनंतर त्यांनी बेळगाव आणि सीमाभागातील मराठी जनतेला आवाहन केले आहे की, कुठल्याही नागरिकाने कन्नडमधील अर्ज स्वीकारू नयेत आणि निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार हक्काने मराठी भाषेतील अर्जांचीच मागणी करावी.

Tags: