बेळगाव मधील क्रीडा वसतिगृहातील ज्युडो खेळाडूंना चिकमंगळूर येथे स्थलांतरित करण्याच्या सरकारच्या निर्णयाला पालकांकडून तीव्र विरोध दर्शवला जात आहे. बेळगाव दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्र्यांना पालकांच्या शिष्टमंडळाने भेटून हा आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे.

बेळगावच्या युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभागाच्या अंतर्गत असणारे ज्युडो क्रीडा वसतिगृह चिकमंगळूर येथे हलवण्याचा आदेश शासनाने दिला आहे. या निर्णयावर पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांची भेट घेऊन पालकांनी स्थलांतर प्रक्रिया थांबवण्याबाबत अधिकृत निवेदन दिले. वसतिगृहात प्रशिक्षण घेत असलेल्या मुलांच्या शैक्षणिक आणि क्रीडा कारकिर्दीच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत गैरसोयीचा असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

बेळगावमध्ये मुलांना आधीच योग्य माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यात आला आहे. ज्युडो प्रशिक्षणात राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदके मिळवून कामगिरी करणाऱ्या या मुलांना आता अचानक शेकडो किलोमीटर दूर असणाऱ्या चिकमंगळूर येथे पाठवल्यास त्यांच्या मानसिक स्थितीवर आणि शिक्षणावर त्याचा विपरीत परिणाम होईल, अशी भीती पालकांनी व्यक्त केली.
कोणत्याही परिस्थितीत वसतिगृहाचे स्थलांतर करू नये, या संदर्भात बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आधीच पालकांच्या बाजूने सरकारला मजबूत शिफारस पत्र पाठवले आहे. सन २००० पासून यशस्वीरित्या कार्यरत असणाऱ्या आणि ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय खेळाडू देशाला देणाऱ्या या ज्युडो केंद्राला बेळगावमध्येच ठेवण्यात यावे, अशी आग्रही मागणी पालक व विद्यार्थ्यांनी केली आहे.
निवेदन स्वीकारल्यानंतर गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, संबंधित विभागाच्या उपसंचालकांशी या विषयावर चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रसंगी ज्युडो विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments