बेळगाव जिल्ह्यातील रायबाग बसस्थानकात लगेज तिकिटाच्या किरकोळ कारणावरून बस वाहकावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत परिस्थिती नियंत्रणात आणली.

निपाणीहून गुलबर्ग्याकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये प्रवाशांच्या सामानाचे (लगेज) तिकीट काढण्यावरून हा वाद सुरू झाला. बसमधील काही प्रवाशांनी क्षुल्लक कारणावरून वाहकाशी हुज्जत घालत त्यांच्यावर अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे बसस्थानकातील प्रवासी आणि आगाराच्या कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वाद होऊन वातावरण बिघडले होते.

घटनेची माहिती मिळताच रायबाग पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ बसस्थानकात धाव घेतली आणि वादावादी करणाऱ्यांना शांत करत परिस्थिती आटोक्यात आणली. याप्रकरणी रायबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


Recent Comments