बेंगळुरू येथील कांतीरवा क्रीडांगणावर आयोजित आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी कर्नाटकला २०२८ पर्यंत पूर्णपणे नशामुक्त करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले. हा संकल्प यशस्वी करण्यासाठी जनता, तरुण आणि विद्यार्थ्यांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

गेल्या तीन वर्षांत तत्कालीन गृहमंत्री परमेश्वर यांच्या कार्यकाळात पोलीस विभागाने ८९ कोटी रुपये मूल्याचे अंमली पदार्थ जप्त करून नष्ट केले आहेत. या कारवाईत सहभागी असलेल्या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी कौतुक केले.

पालकांनी सामाजिक प्रतिष्ठेच्या भीतीने मुलांच्या चुकीच्या सवयी लपवून न ठेवता पोलिसांना विश्वासात घ्यावे, जेणेकरून मुलांना या जाळ्यातून बाहेर काढता येईल, असे सांगत मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मुलांची नावे पूर्णपणे गुप्त ठेवण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले.
अंमली पदार्थांचे सेवन आणि त्याच्या पुरवठ्याबाबत नागरिकांनी किंवा पालकांनी गोपनीय माहिती दिल्यास त्यांना पोलीस विभागाकडून बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले.
पान मसाला आणि गुटख्यामध्ये अमली पदार्थ मिसळून ते फोनद्वारे घरपोच पुरवले जात असल्याची माहिती पोलीस विभागाला मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर, गृहमंत्री प्रियांक खर्गे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस विभाग अशा बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करत असल्याचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.
विश्व आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार देशात तंबाखू सेवनामुळे दरवर्षी १३ ते १४ लाख लोकांचा मृत्यू होतो. ही स्थिती बदलण्यासाठी शाळा-कॉलेजांमध्ये ‘स्टुडंट पोलिसिंग’ आणि विशेष टास्क फोर्सची मदत घेतली जात असल्याचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी नमूद केले.
कर्नाटक हे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उत्तम मानवी संसाधनांचे केंद्र आहे. त्यामुळे येथील तरुण पिढीने अंमली पदार्थांच्या आहारी न जाता देशाचे जबाबदार नागरिक म्हणून योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केले.


Recent Comments