मतदार यादी अचूक आणि दोषमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने राज्यभरात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम राबवली जात आहे. सीमाभागात काही नागरिक दोन्ही राज्यांच्या मतदार यादीत नावे ठेवून दुहेरी मतदान करत असल्याचे समोर आले असून, या त्रुटी सुधारून ‘एक व्यक्ती, एक मत’ या तत्त्वाची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती चिक्कोडीचे उपविभागीय अधिकारी तथा कागवाड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष संपगावी यांनी दिली.

कागवाड तहसील कार्यालयात मंगळवारी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेचा प्रारंभ करताना ते बोलत होते.

कागवाड तालुक्यात एकूण २,०५,३८९ मतदार असून, यात १,०३,३२५ पुरुष आणि १,०२,०५७ महिला मतदारांचा समावेश आहे. तालुक्यात २३१ मतदान केंद्रांवर २३१ बूथ पातळीवरील अधिकारी कार्यरत असून, त्यांना २३ पर्यवेक्षकांचे सहकार्य लाभणार आहे. तसेच कागवाड व अgenericथणीचे क्षेत्र शिक्षणाधिकारी आणि महिला व बालविकास विभागाचे अधिकारी तालुका नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
बीएलओ अधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन मतदारांचे नाव, पत्ता आणि वय याची खात्री करावी, तसेच कायमचे स्थलांतरित, मृत आणि दुहेरी नावे असलेल्या मतदारांची नावे वगळून यादी अद्ययावत करावी, अशा सूचना सुभाष संपगावी यांनी दिल्या. १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांना नाव नोंदणीची आणि इतरांना दुरुस्तीची संधी उपलब्ध असल्याचे सांगत आगामी निवडणुका पारदर्शक व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी शुद्ध मतदार यादी तयार करणे हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रसंगी तहसीलदार रवींद्र हादिमनी, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी वीरन्ना वाली, ग्रेड-२ तहसीलदार रश्मी जकाते, उपतहसीलदार अण्णासाहेब कोरे, महसूल निरीक्षक एम. आर. मुल्ला आणि बीआरपी रवींद्र नांदनी उपस्थित होते.


Recent Comments