Uncategorized

बेळगावात ‘संचय’ टपाल तिकीट आणि नाणे प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Share

बेळगाव येथील महांतेश नगरमध्ये आयोजित “संचय” टपाल तिकीट आणि नाणे संग्रह प्रदर्शनाला दुसऱ्या दिवशीही नागरिकांचा व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

महांतेश नगर रहिवासी संघ, भारत सरकारचा टपाल विभाग आणि बेळगाव टपाल तिकीट व नाणे संग्रहक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

महांत भवन येथे आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन करताना टपाल विभागाचे बेळगाव अधीक्षक बी. पी. माळगी यांनी, टपाल तिकिटे आणि नाण्यांचा संग्रह हा केवळ एक छंद नसून स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी व ज्ञानवृद्धीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले.

बी.एड कॉलेजच्या प्राचार्या डॉ. निर्मला बट्टल आणि रहिवासी संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत गुरव यांनी, इतिहास आणि त्यातील अज्ञात तथ्ये समजून घेण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले.

यामध्ये विविध राजघराण्यांची दुर्मिळ सोन्या-चांदीची नाणी आणि वेगवेगळ्या देशांच्या नोटा प्रदर्शित करण्यात आल्याची माहिती समाजशास्त्र शिक्षिका निलोफर मुल्ला यांनी दिली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बी.एड प्रशिक्षणार्थी, संस्थेचे सचिव संजू पट्टणशेट्टी, प्रियांका चौगुला, डॉ. एस. व्ही. वालिशेट्टी आणि श्रीकांत पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. दोन दिवसांत सुमारे १,५०० हून अधिक विद्यार्थी आणि नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली.

Tags: