Belagavi

मुलगा झाल्याची पार्टी मागितल्याने मित्राची दगड घालून हत्या!

Share

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यात असलेल्या वण्णूर गावात मुलगा झाल्याच्या आनंदात पार्टी मागितल्याच्या कारणावरून एका मित्रानेच आपल्या मित्राची डोक्यात दगड घालून अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

गुन्हा केल्यानंतर पळून गेलेल्या आरोपीला नेसरगी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांच्या आत अटक केली असल्याची माहिती बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत अधिक माहिती अशी कि, २६ जून २०२६ रोजी वण्णूर गावातील हनुमंतप्पा यमनप्पा इतापी याने त्याचा मित्र आणि आरोपी विश्वनाथ सिद्धय्या पूजेरी (वय २९ वर्षे) याच्याकडे पार्टीची मागणी केली. पार्टीवरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून संतापलेल्या विश्वनाथने हनुमंतप्पाला शिवीगाळ करत डोक्यात दगडाने हल्ला केला. या गंभीर हल्ल्यात हनुमंतप्पाचा जागीच मृत्यू झाला आणि आरोपी तिथून फरार झाला होता. याप्रकरणी मृताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून नेसरगी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन, अप्पर पोलीस अधीक्षक रामुगोंडा बसरगी आणि बैलहोंगलचे डीवायएसपी डॉ. वीरय्या हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली नेसरगीचे सीपीआय गजानन नाईक यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने तपास चक्रे वेगाने फिरवत २८ जून २०२६ रोजी आरोपी विश्वनाथ पूजेरी याला बेड्या ठोकल्या. सध्या आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली असून, अवघ्या ४८ तासांत ही यशस्वी कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांनी विशेष कौतुक केले आहे.

Tags: