Belagavi

पोतदार ट्रस्टतर्फे गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत

Share

बेळगाव एज्युकेशन सोसायटीने यशस्वी १०१ वर्षे पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर, पोतदार शिक्षण ट्रस्टतर्फे बी. के. मॉडेल स्कूलच्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना १० लाख रुपयांची शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक आर्थिक मदत दिली जात असल्याची माहिती ट्रस्टचे सचिव अनिल पोतदार आणि अविनाश पोतदार यांनी दिली.

बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, बेळगाव एज्युकेशन सोसायटीला १०१ वर्षे पूर्ण झाली असून, संस्थेचे पीयु कॉलेजही सुरू झाले आहे. सध्या येथे सुमारे २ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विविध घटकांच्या सहकार्याने गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे हेच संस्थेचे मुख्य ध्येय आहे. शाळेची फी भरू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांची प्राचार्यांकडून माहिती घेऊन ही मदत थेट दिली जाणार आहे.

या मोहिमेत कोणताही जाती-धर्म किंवा राजकारण आणले जाणार नसून, केवळ एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये, याच उद्देशाने हे काम केले जात असल्याचे अनिल पोतदार यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षी दुर्गम आणि जंगल भागातील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांना रेनकोट आणि बूट वाटप करण्यात आले होते. यावर्षी ४ शाळांमधील १०७ विद्यार्थ्यांसह इतर गरजू मुलांना एकूण १० लाख रुपयांची मदत दिली जात आहे. पुढील वर्षी यापेक्षाही अधिक मदत करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या पत्रकार परिषदेला रवी पोतदार, दीपक पोतदार, अरविंद हुनगुंद, ग्रामोपाध्याय यांच्यासह विविध शाळांचे प्राचार्य उपस्थित होते.

Tags: