गेल्या १० वर्षांत केंद्र सरकारच्या ८९ टक्के परीक्षांचे पेपर लीक झाले असून, केंद्र सरकार लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत असल्याचा आरोप एआयसीसी सचिव गोपीनाथ पळनियप्पन यांनी केला आहे.

बेळगाव येथील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा संदर्भ देत ते म्हणाले की, या प्रकरणात केवळ केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा देणे पुरेसे नसून, दोषींवर कडक कारवाई होईपर्यंत हा लढा सुरूच राहील. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ पद सोडावे आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

पेपरफुटीच्या मानसिक त्रासामुळे अनेक विद्यार्थी नैराश्यात आले असून, विद्यार्थ्यांच्या फीच्या माध्यमातून जमा होणाऱ्या कोट्यवधी रुपयांचा अपव्यय होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या पत्रकार परिषदेला बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, आमदार आसिफ सेठ, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, सदानंद डंगण्णावर, सुनील हनुमण्णावर आणि सुधाकर बडीगेर उपस्थित होते.


Recent Comments