Belagavi

बेळगावात कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त

Share

बेळगाव शहरातील कलईगार गल्लीत अधिकारी आणि कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील भुयारी गटाराचे काम अर्धवट ठेवून कंत्राटदार गायब झाल्याने संपूर्ण गल्लीत समस्या निर्माण झाल्या आहेत.

कलईगार गल्लीतील जुनी आणि लहान वाहिनी बदलून मोठी पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, कंत्राटदाराने हे काम अर्धवट सोडल्याने सध्याच्या वाहिनीतून सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सुमारे २० दिवसांपूर्वी रस्ता खोदून हे काम सुरू करण्यात आले होते, पण गेल्या आठवड्यापासून येथे एकही कामगार आलेला नाही. खड्डे तसेच असल्याने रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाला आहे. परिसरात दुर्गंधी पसरल्याने लहान मुले, महिला आणि वृद्धांचे हाल होत आहेत.

पावसाळा तोंडावर असल्याने मुसळधार पाऊस झाल्यास या रस्त्यांवर चिखल होऊन परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन हे काम पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी कलैगार गल्लीतील नागरिकांनी केली आहे.

Tags: