Belagavi

बेळगावचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य आनंद आपटेकर यांना ‘राजर्षी शाहू महाराज प्रेरणा पुरस्कार’ प्रदान

Share

बेळगाव सीमाभागातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक प्राचार्य आनंद आपटेकर यांना कोल्हापूर येथे आयोजित पहिल्या अखिल भारतीय लोकराजा राजर्षी शाहू महाराज संवाद परिषदेत प्रतिष्ठित ‘लोकराजा राजर्षी शाहू महाराज प्रेरणा पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

राजर्षी शाहू महाराजांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त ‘गंगाधर’ वृत्तपत्राच्या वतीने दसरा चौकातील मोहम्मद अली एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. शंकर अंदानी यांच्या अध्यक्षतेखाली आणि पद्मश्री उदय देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या हस्ते प्राचार्य आपटेकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्राचार्य आनंद आपटेकर यांनी बेळगाव मध्यवर्ती दसरा कमिटीचे अध्यक्ष, ‘बेळगावचा राजा’ गणेश मंडळाचे कार्यवाह, भारतीय गुरुकुल शिक्षण संस्थेचे संस्थापक-कार्यवाह आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे वैद्यकीय समन्वयक म्हणून उल्लेखनीय जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान मोलाचे मानले जाते.

या सोहळ्याला ज्येष्ठ साहित्यिक किसनराव कुऱ्हाडे, लक्ष्मण किल्लेकर, संदीप कदम, परशराम गाडेकर, श्रीराम पच्छिंग्रे, दादासाहेब लाड आणि अक्काताई नलवडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी प्राचार्य आपटेकर यांच्या पुढील सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या.

Tags: