Belagavi

बेळगावात मोहरंम सण शांततेत आणि सलोख्याने संपन्न

Share

सीमावर्ती बेळगाव शहरात मोहरंम सण अत्यंत शांततेत, सलोख्याने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. सणाच्या दहाव्या दिवशी शहरात विविध धार्मिक विधी आणि मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले होते, ज्याने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

मोहरंमचा शेवटचा दिवस बेळगाववासीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या दिवशी सकाळी शहरात ठिकठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या पंजा आणि ताबूतांची नागरिकांनी श्रद्धापूर्वक पूजा केली. सकाळी पंजांचे मिलन अत्यंत उत्साहात पार पडले. त्यानंतर रात्री ऐतिहासिक किल्ले तलावात सर्व पंजांच्या विसर्जनाने सणाची सांगता झाली. या निमित्ताने विविध समाजातील नागरिकांनी एकत्र येत मुख्य मार्गावरून ताबूतांची भव्य मिरवणूक काढली.

शहरातील प्रसिद्ध दरबार गल्ली येथे पारंपरिक खेळ आणि कलांचे सादरीकरण करण्यात आले होते. या सांस्कृतिक व साहसी क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार आसिफ सेठ आणि डीसीपी नारायण भरमणी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी उपस्थित राहून तरुणांचा उत्साह वाढवला.

दुसरीकडे, न्यू गांधीनगर परिसरातील मिरवणुकीत मोठ्या संख्येने तरुण एकत्र आले होते. नगरसेवक अजीम पटवेगार यांनी विशेष आयोजित केलेल्या डीजे सिस्टीममुळे मिरवणुकीत आणखी रंगत आली. तरुणांनी डीजेच्या तालावर ठेका धरत उत्साही वातावरणात मिरवणूक काढली.

बेळगाव शहरात कोणतीही अनुचित घटना न घडता मोहरंम सण अत्यंत शांततेत पार पडला. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनातर्फे शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस अधिकाऱ्यांची दक्षता आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे हा सण धार्मिक सलोख्याचे प्रतीक ठरला.

Tags: