Belagavi

हिंडाल्कोत रोजगारासाठी गौंडवाड ग्रामस्थांचे मंत्री सतीश जारकीहोळी यांना साकडे

Share

बेळगावच्या हिंडाल्को कंपनीतील नोकरभरतीमध्ये समान संधी देण्यात यावी, या मागणीसाठी गौंडवाड ग्रामस्थांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन दिले आहे. कंपनीमुळे बाधित झालेल्या गावांच्या यादीत गौंडवाडचा समावेश करण्याची मागणी गावातील तरुणांनी लावून धरली आहे.

हिंडाल्को कंपनीच्या स्थापनेपासूनच औद्योगिक प्रदूषण आणि भूसंपादनाचा मोठा फटका गौंडवाड गावाला बसला आहे. यापूर्वी यमनापूर, काकती, मुत्यानट्टी, कणबर्गी आणि बस्सनकोळ्ळा या आजूबाजूच्या गावांप्रमाणेच गौंडवाडलाही समान सवलती दिल्या जात होत्या. मात्र, सध्याच्या नोकरभरतीत पात्र गावांच्या यादीतून गौंडवाडचे नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी या विषयात त्वरित लक्ष घालून गावातील तरुणांना नोकरीची समान आणि न्याय्य संधी मिळवून द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या प्रसंगी दिलीप चौगुले, नारायण पिंगट, भैरू पवार, लक्ष्मण पाटील आणि बाबू दोडमणी यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: