अब्कारी विभागाचे अधिकारी दलित विरोधी धोरण राबवत असल्याचा आरोप करत विविध दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी चिक्कोडी शहरात भव्य निषेध मोर्चा काढला. आंदोलनकर्त्यांनी मिनी विधानसौध येथे जाऊन तहसीलदार आणि अब्कारी विभागाला मागण्यांचे संयुक्त निवेदन सादर केले.


हुक्केरी तालुक्यातील रक्षी गावचे दलित व्यावसायिक सुरेश तलवार यांनी कर्ज काढून ‘जीटी बार अँड रेस्टॉरंट’ सुरू केले आहे. मात्र, त्यांना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी त्यांच्या बारच्या जवळच सुलतानपूर, अवरगोळ आणि सारापूर क्रॉस येथे नियमबाह्यपणे एमएसआयएल (दारूची दुकाने) सुरू करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. एसटी प्रवर्गासाठी मंजूर असलेले दुकान सामान्य प्रवर्गात बदलून त्याचे चुकीच्या पद्धतीने स्थलांतर करण्यात आले असून, यासाठी स्थानिक आमदार किंवा ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

अब्कारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी राजकीय दबावाला बळी पडून नियमांचे उल्लंघन केले आहे आणि दलित व्यावसायिकाला जाणीवपूर्वक आर्थिकदृष्ट्या खचवण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी आणि त्या एमएसआयएल दुकानांचे परवाने त्वरित रद्द करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर तातडीने तोडगा न निघाल्यास संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनांच्या नेत्यांनी दिला आहे. या आंदोलनात सुरेश तलवार, उदय हुक्केरी यांच्यासह अनेक प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments