Belagavi

बेळगावमध्ये खेलो इंडिया अंतर्गत भव्य हॉकी मैदानाची निर्मिती होणार

Share

हॉकीचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या बेळगावमधील क्रीडा क्षेत्राला नवी गती देण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया’ योजनेअंतर्गत सर्व सोयी-सुविधांनी युक्त अत्याधुनिक हॉकी मैदान उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुदाम मंचलवार यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

बेळगावचा क्रीडा वारसा पुन्हा जिवंत करण्यासाठी ‘हॉकी बेळगाव’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सकल मराठा समाजाचे नेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते किरण जाधव यांच्या नेतृत्वाखाली खासदार जगदीश शेट्टर आणि सीईओ सुदाम मंचलवार यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी खासदार शेट्टर यांनी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून विशेष निधी मंजूर करून आणण्यासाठी दिल्लीत वैयक्तिक पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले.

कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ सुदाम मंचलवार यांनी या प्रकल्पाचा प्रस्ताव तातडीने दिल्लीला पाठवण्याचे निर्देश दिले असून, या कामाची तांत्रिक जबाबदारी कार्यकारी अभियंता सतीश मन्नोळकर यांच्याकडे सोपवली आहे. या बैठकीला ‘हॉकी बेळगाव’चे पदाधिकारी गोपाळप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, प्रकाश बेळगोजी, उत्तम शिंदे, नामदेव सावंत, सागर पाटील आणि कविता वेसणे यांच्यासह अनेक क्रीडाप्रेमी उपस्थित होते. नवीन मैदानामुळे स्थानिक युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Tags: