DEATH

ज्येष्ठ साखर उद्योजक राजाभाऊ शिरगावकर यांचे निधन

Share

कागवाड तालुक्यातील उगार शहराचे ज्येष्ठ साखर उद्योजक, समाजसेवक आणि उगार साखर कारखान्याचे मालक राजाभाऊ शिरगावकर यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. निधनसमयी ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने साखर उद्योग क्षेत्रातील एका मार्गदर्शकाला समाज मुकला आहे.

राजाभाऊ शिरगावकर यांनी उगार साखर कारखान्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रगतीसाठी आपले आयुष्य पणाला लावले होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे आणि स्नेहाचे संबंध होते. नवी दिल्ली येथील नामांकित ‘इंडियन शुगर एक्झिम कॉर्पोरेशन’ चे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही वर्षे काम पाहिले होते, जिथे त्यांनी साखर उद्योगात आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले. यासोबतच ते उगार लायन्स क्लबचे संस्थापक आणि सांगलीच्या प्रसिद्ध ‘नूतन बुद्धिबळ संस्थेचे’ संस्थापक म्हणूनही ओळखले जात होते.

राजाभाऊ शिरगावकर यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी उगार येथील रुद्रभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, अशी माहिती उगार साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.

Tags: