बेळगाव महानगरपालिकेच्या ५ टक्के कल्याणकारी योजनेअंतर्गत २६ दिव्यांग लाभार्थ्यांना त्रिचक्र वाहनांचे वाटप तसेच महापालिकेच्या नवीन जन्म-मृत्यू हेल्पलाइन केंद्राचेही उद्घाटन करण्यात आले.


उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ आणि महापौर प्रीती कामकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात महानगरपालिकेच्या ५ टक्के योजनेतील ३८ लाख ९८ हजार ७०० रुपयांच्या निधीतून दिव्यांगांना या वाहनांचे वितरण करण्यात आले. या सोहळ्याला उपमहापौर हनुमंत कोंगाळी, सभागृह नेते संतोष पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्षा राठोड आणि मनपा नगरसेवक उपस्थित होते.


महापालिकेच्या निधीतून दिव्यांगांना वाहने देण्यात आली असून, हा उपक्रम त्यांच्या स्वावलंबनासाठी उपयुक्त ठरेल. गरजू दिव्यांगांना आवश्यक ती मदत देण्यास महापालिका आणि सरकार कटिबद्ध आहे. तसेच शहरातील खेळाडूंना क्रीडा साहित्य पुरवण्याबाबत आगामी बैठकीत योग्य निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही आमदार आसिफ सेठ यांनी दिली.

महापौर प्रीती कामकर यांनी महापालिकेच्या या कल्याणकारी योजनेचा लाभार्थ्यांनी आपल्या प्रगतीसाठी सदुपयोग करावा, असे आवाहन केले. तर उपमहापौर हनुमंत कोंगाळी यांनी महापालिकेच्या वतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंनाही सातत्याने प्रोत्साहन आणि साहाय्य दिले जात असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला महापालिकेचे अधिकारी आणि लाभार्थी उपस्थित होते.


Recent Comments