Belagavi

बेळगावात ‘कर्नाटक रक्षण वेदिके’चा नवा ‘ड्रामा’!

Share

सीमाभागात काही ना काही निमित्त शोधून नेहमीच धुमाकूळ घालणाऱ्या ‘कर्नाटक रक्षण वेदिके’ने (शिमरामगौडा गट) बेळगावात पुन्हा एकदा आंदोलनाचा नवा स्टंट सुरू केला आहे.

लोकशाही मार्गाने आपल्या हक्कांची मागणी करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेला नाहक लक्ष्य करत, या संघटनेने केवळ प्रसिद्धीसाठी आणि वातावरण बिघडवण्यासाठी प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. धर्मवीर संभाजी चौकातून रॅली काढत ‘करवे’च्या कार्यकर्त्यांनी कित्तूर राणी चन्नम्मा चौकात एकत्र येऊन गोंधळ घातला आणि मराठी भाषिकांविरोधात गरळ ओकली.

२२ जून रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या न्याय्य मागण्यांचे निवेदन दिले होते. यावर निरर्थक मुद्दा उपस्थित करण्याच्या उद्देशाने ‘कर्नाटक रक्षण वेदिके’चे जिल्हाध्यक्ष वाजीद हिरेकोडी यांनी नवा वाद उकरून काढला. जिल्हाधिकाऱ्यांनी म.ए. समितीच्या नेत्यांशी हिंदीत संवाद साधल्याचा आणि बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याचा राग मनात धरून हिरेकोडी यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्याच बदलीची मागणी लावून धरली. “जर जिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीबद्दल सहानुभूती असेल तर त्यांनी महाराष्ट्रात जावे,” असे बेजबाबदार वक्तव्य करत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. तसेच म.ए. समितीने मराठीच्या हक्काची मागणी करणारी कागदपत्रे फाडल्याचा जावईशोध लावत नेहमीप्रमाणे ‘कर्नाटक बंद’ची वल्गना केली.

या संकुचित आंदोलनादरम्यान ‘करवे’चे उत्तर कर्नाटक अध्यक्ष महांतेश रणगट्टीमठ यांनी मराठी-कन्नड सौहार्दतेचा खोटा आव आणत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते शुभम शेळके यांच्यावर निशाणा साधला. सीमाभागात मराठी भाषिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या शुभम शेळके यांना तडीपार करावे, अशी हुकूमशाही मागणी करत त्यांनी स्वतःचा दांभिकपणा उघडा केला. तसेच महानगरपालिकेत मराठी विरोधी ठराव मंजूर करण्यासाठी प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मराठी भाषिकांना नाहक त्रास देण्याच्या आणि प्रशासनाला वेठीस धरण्याच्या या द्वेषपूर्ण आंदोलनात नेहमीप्रमाणे कन्नड संघटनेचे मुठ्भरच कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: